तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासन व प्रशासनाच्यावतीने आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून यादृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना करव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे,

आमदार ॲड.अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, आमदार भीमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,

आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, टास्क फोर्सचे डॉ. डी. बी.कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील ‘कोरोना’ विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे.

याद्वारे लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, हॉस्पिटल, नायडू रुग्णालय या रुग्णालयांसह जिल्ह्यातील भारती हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल,

रुबी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा खाजगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. ‘म्युकर मायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे.

या रोगासाठीच्या औषधांचा पुरवठा रुग्णालयांना सुरळीत होण्यासाठी तसेच यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी या औषधांचा पुरवठा देखील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यात 44 ऑक्सीजन जनरेशन प्लांट प्रस्तावित आहेत. यापैकी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी 2 असे एकूण 4 ऑक्सीजन जनरेशन प्लांट सुरू झाले आहेत, अन्य ऑक्सिजन जनरेशन प्लांट देखील लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts