महाराष्ट्र

Maratha Reservation : २४ डिसेंबरनंतर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार

Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला २ जानेवारीपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी समाजाच्या पदरात आरक्षण पाडून घेण्यासाठी पुढचा लढा निकराने लढावा लागणार आहे.

त्यासाठी १ डिसेंबरपासून राज्यभर साखळी उपोषण करण्यात येईल, अशी माहिती मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी येथे दिली. सोबतच आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करून आंदोलनाची पुढील दिशा सांगणार असल्याचेही ते म्हणाले.

मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझी तब्येत आता चांगली असून मी ठणठणीत आहे. कुणीही काळजी करू नये.

मात्र आता आरक्षण मिळाल्याशिवाय आपण शांतबसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. आरक्षण मिळत असल्याचे दिसत असल्याने चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार आहे.

पुढील आंदोलनाची दिशा काय असणार, याबाबत माहिती देताना जरांगे म्हणाले, मी पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. दौऱ्याची रूपरेषा कशी असेल हे लवकरच आपण स्पष्ट करणार आहोत. या तिसऱ्या टप्यातील दौऱ्यात राज्यातील उर्वरित भागातील समाज बांधवांशी संवाद साधणार आहे.

त्यांना मराठा आरक्षणामागची भूमिका समजावून सांगणार आहे. पुढील लढाई अधिक जोमाने लढण्यासाठी समाज बांधवांना तयार करणार आहे. तसेच मराठा आरक्षण व आंदोलनाची धग तेवत ठेवण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याच्याही सूचना आपण दिल्याचे ते म्हणाले.

आत्महत्या करू नका

राज्य सरकारने नियुक्त केलेली माजी न्यायमूर्तीची समिती युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील विविध भागांतून सनदशीर मार्गाने कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेले पुरावे मिळत आहेत.

त्यामुळे २४ डिसेंबरनंतर नक्कीच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे तरुणांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. सोबतच गावोगावी सुरू होणाऱ्या साखळी उपोषणादरम्यान कोणत्याही ठिकाणी उग्र आंदोलन करू नये. अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असेही त्यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts