अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी थेट आरोप केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
प्रवक्ते महेश तपासे यांनी व्हिडीओ शेअर करत ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. पवारसाहेबांच्या नखाइतकी उंची जर राज ठाकरेंची असती तर नक्कीच ते एक कर्तुत्ववान नेते म्हणून राज्यामध्ये वावरले असते, अशी टीका तपासे यांनी केली आहे.
तपासे म्हणाले, ठाकरे यांनी शिक्षणाचा, आरोग्याचा, रोजगाराचा, सामाजिक व धार्मिक एकात्मतेचा अल्टिमेटम दिला असता तर आम्ही सर्वांनी त्यांचे स्वागत केले असते.
मात्र, भाजपने दिलेली स्क्रिप्टच गिरवायची आता एवढेच काम राज ठाकरेंना राहिले आहे. या भाषणाकडे कानाडोळाच करणे महाराष्ट्राच्या हिताचे आहे.
ठाकरे स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रकारचा नवीन सामाजिक व राजकीय विचार राज ठाकरे देऊ शकले नाही. म्हणूनच आतापर्यंत राजकारणात त्यांचा पक्ष अपयशी ठरलेला आहे.
शरद पवारांसारख्या कृतिशील नेत्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही, आणि म्हणूनच त्यांच्यावर काही नेते बोलतात.
महाराष्ट्रात जातीय व धार्मिक एकात्मता राखण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम आहे, असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.