अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण बसणार याचा फैसला होणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 31 डिसेंबर रोजी होणार आहे. महसूलच्या उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील सहायक निवडणूक निर्णय अधिकरी असून,
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदेचे स्थान महत्वपूर्ण मानले जाते. पंचायत राज व्यवस्थेत महत्वाची संस्था म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकाऱ्यांची पहिली टर्म संपली आहे.
पुढील टर्मसाठी ग्रामविकास विभागाने सोडतीद्वारे अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले. सध्या शालिनी विखे पाटील अध्यक्ष असून उपाध्यक्ष राजश्री घुले आहे.
ग्रामविकासाच्या निर्देशानुसार आता जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम घोषित केला आहे. 31 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निगराणीत अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे.
अहमदनगर जिल्हा प्रशासन जिल्हा परिषदेच्या 73 सदस्यांना निवडणूक कार्यक्रमाच्या नोटीसा शनिवारी पाठविणार आहे. तीन पक्षाची विकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार आणि विखेंना कोण शह देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेत 73 सदस्य असून यामध्ये 39 महिला असल्याने आता पुन्हा एकदा झेडपीमध्ये महिला राज येणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सत्ता आल्याने आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षदावर महाआघाडीचा पहिला अध्यक्षपदाचा मान कोणाला मिळणार हे पाहावे लागणार आहे.
31 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 01 या वेळेत नामनिर्देश भरणे, दुपारी 3 वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या अर्जाची छाननी, त्यानंतर माघार आणि गरज भासल्यास निवडणूक असा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषदेचे 73 सदस्य आहेत. नगर दक्षिणेतील 04 विधानसभा मतदारसंघ आणि नगर तालुक्यातील आहेत. उर्वरित जिल्हा परिषदेच्या 41 सदस्य हे उत्तर जिल्ह्यातील आहेत. यात संगमनेर आणि राहाता तालुक्यातील तब्बल 15 सदस्यांचे वर्चस्व आहे.
जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस असून काँग्रेसचे 23 सदस्य असून त्याखालोखाल राष्ट्रवादीचे 19, भाजप 14 तर शिवसेना 9 सदस्य आहेत.नेवाशातील क्रांतीकारी पक्षाचे 5 तर उर्वरित 4 सदस्य अपक्ष, अन्य छोटे पक्ष अथवा आघाडीचे सदस्य आहेत. किरण लहमटे आमदार झाल्यामुळे एक जागा रिक्त आहे. त्यामुळे आता 72 जागा राहिल्या आहेत.