अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेत राजकारण आता जोर धरू लागले असून स्थायी सभापती निवडीतील नाट्यमय घडामोडीनंतर आता भाजपाच्या महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
भाजपाच्या मनोज कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाऊन स्थायी समिती सभापती पद मिळविले. त्यानंतर मात्र शिवसेनेने त्यांच्यावर आगपाखड केली असून मनोज कोतकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे.
तसेच महापौर बाबासाहेब वाळके यांनी कोतकर हे भाजपाचेच असल्याचे म्हटले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान ही महाविकास आघाडीची फसवणूक असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक योगीराज गाडे यांनी दिली असून ही तर महाविकास आघाडीचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फसवणूक असल्याचे गाडे यांनी म्हटले आहे.
आता या प्रकारानंतर वरिष्ठ पातळीवर हा विषय गेला असून संख्याबळाच्या आधारावर वरिष्ठांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अहमदनगर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याचे आदेश दिले असल्याची चर्चा असून आता भाजपा महापौरांवर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved