अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड मंगळवार (३१ डिसेंबर) ला होत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे.
काँग्रेसच्या शालिनी विखे यांच्याकडे अध्यक्ष, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्याकडे होते. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
भाजपच्या पराभूत आमदारांनी केलेल्या तक्रारींसंबंधी शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
त्यामध्ये मूळ विषयासोबत ‘झेडपी’च्या निवडणुकीवरही चर्चा झाली. महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजपने जोर लावण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. त्याची जबाबदारी विखे आणि शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
त्यानुसार ते शनिवारी नगरला बैठक घेणार आहेत. त्यामध्ये यासंबंधी निर्णय होईल. अर्थात भाजपला ही निवडणूक जिंकण्यासाठी फोडाफोडीचाच आधार घ्यावा लागणार आहे.
त्यासाठी तुल्यबळ आणि ज्यांच्यासाठी इतर पक्षातील सदस्य येऊ शकतील, असा उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.