अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेची महासभा सुरू झाली आणि द्विवेदींनी स्वीकृत नगरसेवकपदांसाठी आलेल्या पाचही प्रस्तावांची छाननी केली असून, कागदपत्रांच्या त्रुटी असल्याने हे पाचही प्रस्ताव अमान्य करत तशी शिफारस महापौरांना करीत असल्याचे स्पष्ट केल्यावर महासभेत सन्नाटा पसरला व सर्वच नगरसेवक सुन्न झाले.
अखेर आयुक्तांनी अमान्य केलेल्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करणेच महापौर वाकळेंनी पसंत केले. पण त्यानंतर भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले.
‘महापालिकेचे नगरसचिव एस. बी. तडवी यांनी प्रस्ताव तपासून त्यातील त्रुटी दूर करण्याबाबत सांगितले असते तर आवश्यक कागदे जोडता आली असती. पण ते त्यांनी केले नाही’, असा आरोप एका नगरसेवकाने केला.
त्यावर तडवी यांनी, ‘प्रस्तावाची छाननी व तो मान्य-अमान्य करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. केवळ आलेला प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा मी पोस्टमन आहे.
मी जर तुमचे प्रस्ताव तपासत बसलो असतो तर आता १०-१२ नगरसेवक माझ्या केबिनमध्ये घुसले असते’, असे वाक्य उच्चारले आणि सभागृहात जोरदार हशा उसळला.त्यावर एकाने, ‘नगरसेवक गुंड आहेत काय’, असा सवाल केला. पण हशात तो विरून गेला.
महासभा संपल्यावर शिवसेना-भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांच्यावर तुटून पडले. ‘तुम्ही आजच निवडी जाहीर करून टाकायच्या होत्या. पुढे काय होईल हे पुढचे पुढे पाहता आले असते’, असेही काहींनी त्यांना सांगितले. पण. ‘मी केले ते बरोबर केले. महिनाभरात आपण पुन्हा सभा घेऊ व हेच प्रस्ताव सर्व पूर्तता करून मान्य करू’, अशी ग्वाही देऊन त्यांनीही नाराजांचे समाधान करण्यात यश मिळवले.