संतापजनक! खासगी कोविड रुग्णालयांकडून रुग्णांची लूट

नवी मुंबई एकीकडे प्रशासन, महापालिका कोरोनारुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटत असताना एक संतापजनक गोष्ट समोर आली आहे. नवी मुंबईत खासगी कोविड रुग्णालये कोरोना रुग्णांची अवाजवी लूट करत आहेत.

या रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांना किमान दीड ते दोन लाख रुपये खर्च येत आहे. कोरोना उपचारांसाठी राज्य सरकार तसेच मुंबई-ठाणे या पालिकांनी दरनिश्चिती केली असतानाही नवी मुंबई महापालिका प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही पावले उचलली नसल्याची माहिती आहे.

नवी मुंबई महापालिकेने आपली प्रशासकीय यंत्रणा सज्ज केली आहे. सूक्ष्म लक्षणे व जास्त लक्षणे असणारे रुग्ण असे दोन गटांत रुग्ण विभागून दिले आहेत. ज्या रुग्णांना अति सूक्ष्म लक्षणे आहेत अशांसाठी वाशी, सीबीडी, पनवेल आणि घणसोली येथे कोविड उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

तीव्र लक्षणे असलेल्या वा पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी महापालिकेचे वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात १३० खाटांची तर नेरुळ येथील तेरणा रुग्णालयात २५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या दोन रुग्णालयांत परवडेल अशा दरांमध्ये उपचार घेण्याचा पर्याय रुग्णांपुढे आहे. मात्र महिनाभरापासून वाढत असलेल्या करोना रुग्ण संख्येमुळे या रुग्णालयांतील खाटा भरल्या असून अनेकांना खासगी कोविड रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

सद्य:स्थितीत नवी मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील, हिरानंदानी आणि कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटल हे तीन खासगी कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

मात्र या रुग्णालयांकडून करोना उपचारांसाठी अवाच्या सवा बिल आकारणी करण्यात येत आहे. वाशीतील एका खासगी कोविड रुग्णालयात तर करोना उपचारासाठी रुग्ण दाखल होताच त्याच्यापुढे ७५ हजार रुपयांपासून दोन लाखांपर्यंत उपचाराचे पॅकेज समोर ठेवले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts