Pune News : गेल्या महिनाभरात राज्यातील विविध भागांमध्ये डोळे येण्याची साथ ओसरली आहे. मात्र, आतापर्यंत संपूर्ण राज्यात तब्बल साडेपाच लाख नागरिकांचे डोळे आले असून पुणे जिल्हा राज्यात टॉपवर आहे.
पुण्यात मावळ मुळशी आतापर्यंत ५२ हजार वेल्हे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याच्या साथरोग विभागाने दिली आहे. तसेच, या आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होतो.
त्यामुळे नियमित हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. तसेच, परिसर स्वच्छता ठेवून माशा, डास यांचे प्रमाण कमी करा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
राज्यात डोळे येण्याची सुरुवात प्रथम पुण्यातच झाली होती. जुलै महिन्यात पुण्यातील आळंदीत डोळे आलेले रुग्ण आढळले होते. पुढे ही साथ जिल्ह्यात पसरली. त्यानंतर याच साथीने राज्यभर थैमान मांडले.
राज्यात पुण्यानंतर बुलढाणा ५० हजार, जळगाव २९ हजार, चंद्रपूर २७ हजार आणि अमरावती २३ हजार असे पाच जिल्हे टॉप फाइव्हमध्ये आहेत. तर राज्यात सर्वात कमी ५९ इतकी रुग्णसंख्या उल्हासनगर महापालिकेच्या क्षेत्रात आढळून आली आहे.
डोळे येणे मुख्यत्वे एडीनो व्हायरसमुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे, अशी लक्षणे आढळतात. हा आजार होऊ नये म्हणून जनतेने वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.