Pune News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात लोकार्पण करण्यात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूच्या चिर्लेकडील जोडणी पुलाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे चिलें ते पुणे आणि पर्यायाने दक्षिण मुंबई ते पुणे प्रवास वेगाने होणार आहे.
शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबईदरम्यान २२ किमीचा सागरी मार्ग उभारण्यात आल्याने प्रवासाचा वेळ कमी झाला आहे, तर दक्षिण मुंबईकडील शिवडी ते वरळी उन्नत मार्गाच्या जोडणी पुलाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.
दुसरीकडे चिलें आणि पुणे जोडणी पुलासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या जोडणी पुलासाठी १० अब्ज खर्च प्रस्तावित आहे. जोडणी पुलाचे काम ३० महिन्यांत पूर्ण होणार असून या जोडणी पुलामुळे मुंबई आणि पुणेदरम्यानचा प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होणार आहे.
तर दक्षिण मुंबईचे टोक गाठताना शिवडी, रे रोड परिसरातील वाहतूक कोंडी, पी डीमेलो मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज स्थानकापर्यंत वाढत जाते. सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर सीएसएमटी स्थानक ते पूर्वमुक्त मार्ग गाठण्यासाठीच ३० ते ४५ मिनिटे खर्ची होतात.
पुढे अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांसाठी डॉकयार्डजवळील रॅम्पने सेतू गाठताना कोंडी होत असल्याचे दिसून येते. पुलाच्या खालील बाजूसही अवजड वाहने, खासगी वाहनांची गर्दी पाहावयास मिळते. वरळी-शिवडी कनेक्टरचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
मात्र एल्फिन्स्टनमधील १९ इमारतींतील रहिवाशांच्या पुनविर्कासाचे धोरण निश्चित न झाल्याने काम प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. १७ मीटर रूंद असा जोडणी पूल जमिनीपासून १५ ते २७ मीटर उंच असून या प्रकल्पासाठी १ हजारहून अधिक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या प्रकल्पाच्या कामाला मेसर्स जे. कुमार या कंत्राटदारांच्या माध्यमातून २०२१ मध्ये सुरुवात करण्यात आली असून २०२४ मध्ये प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र या रस्त्यासाठी ८५० झोपड्यांसह १९ इमारती बाधित होत आहेत. या इमारतींमध्ये निवासी व अनिवासी दोन्ही रहिवाशांचा समावेश आहे. या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कसे करावे, हा प्रश्न एमएमआरडीएसमोर आहे.