महाराष्ट्र

औरंगाबादच्या नामांतराचा निर्णयही रद्द, नव्या सरकारचं चाललंय काय?

Maharashtra news:एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटाच सुरू झाला आहे.

त्यामध्ये आता एका महत्वपूर्ण निर्णयाचीही भर पडली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो आता शिंदे सरकारने रद्द केला आहे.

यासंबंधी नव्याने निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.या निर्णयाचे श्रेय आधीच्या सरकारला विशेषत: उद्धव ठाकरे यांना जाऊ नये, यासाठी ही खेळी खेळली जात असल्याचं जाणकरांचं मत आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात असल्यानं आणि राज्यपालांनी बहुमत चाचणीचं पत्र दिल्यानंतर हे निर्णय घेतल्यानं आक्षेप घेतला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या निर्णयापासून स्वत:ला वेगळे केले होते.

आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या शिंदे सरकारने बाळासाहेबांचीच मागणी असलेला हा निर्णय रद्द केल्याने त्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याचे श्रेय ठाकरे यांना जाऊ न देता नव्या सरकारकडून हा निर्णय पुन्हा घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts