अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांकडून मोठा धक्का आज बसला आहे कारण चक्क शरद पवार यांनीच अमोल कोल्हे यांच्या वादग्रस्त भूमिकेची पाठराखण केली आहे.
‘व्हाय आय किल्ड गांधी’ या सिनेमात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यावरून वाद सुरू असून राष्ट्रवादीत दोन गट पडलेले असतानाच राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी मात्र अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे.
अमोल कोल्हेंनी कलावंत म्हणून गोडसे साकारला असेल तर तो गांधीविरोधक ठरत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट करून कोल्हे यांची पाठराखण केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना अमोल कोल्हे यांची बाजू घेतली.
तसेच सिनेमातील भूमिका आणि व्यक्तिगत आयुष्य यात फरक असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. त्या सिनेमात गांधीवरील सिनेमा अमेरिकेतून प्रदर्शित झाला. गांधी सिनेमा जगात गाजला. त्यामुळे जगात गांधींना महत्त्व आलं. त्या सिनेमात कुणीतरी गोडसेची भूमिका केली.
ती भूमिका करणारा आर्टिस्ट होता. नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि औरंगजेब संघर्ष झाला.
शिवाजी महाराजांच्या सिनेमात जर कुणी शिवाजी महाराजांची भूमिका घेत असेल आणि कुणी औरंगजेबाची भूमिका करत असेल तर औरंगजेबाची भूमिका करतो म्हणून तो मोगल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही.
तो कलावंत म्हणून भूमिका करत असतो. किंवा रामराज्यातील सिनेमा असेल तर राम रावणाचा संघर्ष असेल रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही.
तो कलाकार असतो. सीतेचं अपहरण दाखवलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही. रावणाचा तो इतिहास या माध्यमातून दाखवला जातो, असं सांगतानाच अमोल कोल्हेंनी भूमिका साकारली असेल तर ती कलावंत म्हणून केली आहे. त्याकडे कलाकार म्हणूनच पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले आहेत.