अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- भारतीय जनता पक्षाचे नेते रोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत.
त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, भाजपाच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही, भाजपाचे नेते मागील दोन वर्षापासून मविआ सरकार पडणार अशा भविष्यवाण्या नेहमीच करत असतात पण त्यांचे भविष्य काही खरे ठरत नाही.
महाविकास आघाडीला दोन वर्ष झाली तरी त्यांना अजूनही दररोज सरकार पडण्याचीच स्वप्ने पडत आहेत. मात्र त्यांची भविष्यवाणी काही खरी ठरणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार अशी भविष्यवाणी केली आहे. राणेंच्या या भविष्यवाणीचा समाचार घेत नाना पटोलेंनी त्यांची खिल्ली उडवली आहे.
राणेंवर टीका करताना, भाजप खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे, त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे. भाजपची भविष्यवाणी गेली दोन वर्षे सुरु आहे. मात्र महाविकास आघाडी पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास पटोलेंनी मीडिया बोलताना व्यक्ती केला.