Maharashtra News : राज्यासह देशभर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगडाला जोडणारे प्रत्येक रस्ते चांगले असावेत, अशी भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांची इच्छा होती. ग्रामविकासमंत्री असताना त्यांनी मोठा निधी दिल्यामुळे भगवानगडाला जोडणाऱ्या रस्त्याची कामे चांगली व दर्जेदार झाली.
मात्र कोरडगाव -नांदुर निबादैत्य मार्गे श्रीक्षेत्र भगवानगडाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम प्रलंबित होते. आज या रस्त्याच्या बारा कोटी रुपयांच्या कामाचे भुमिपुजन झाल्यामुळे भगवानगडाला जोडणारे सर्वच रस्ते चांगले होणार असून, भाविकांची मोठी सोय होणार आहे, याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
तालुक्यातील विविध विकासकामांचे भुमिपुजन आ. राजळे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी कोरडगाव येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बाजार समीतीचे माजी सभापती दिलीप देशमुख होते. या वेळी बांधकाम विभागाचे उप अभियंता वसंत बड़े,
शाखा अभियंता जे. यु. सय्यद, भाजपा तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, वृध्देश्वरचे संचालक नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले, महादेव जायभावे, बाजार समितीचे संचालक मधुकर देशमुख नारायण पालवे, भगवान साठे, बंडू पठाडे,
सोनोशीचे सरपंच बळीराम काकडे, जिरेवाडीचे सरपंच मुकुंद आंधळे, निपाणी जळगावचे सरपंच नितीन गर्जे, तोंडोळीचे सरपंच नंदु वारंगुळे, बाळासाहेब देशमुख, गोटु मुखेकर, भाउसाहेब काकडे, कोरडगावचे माजी सरपंच विष्णु देशमुख, दादा किलबिले, आदी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलता आ. राजळे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात विरोधी पक्षाच्या आमदार असलेल्या मतदारसंघात निधी वाटपात भेदभाव करून अन्याय केला गेला. मात्र, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आल्यापासुन शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विकासकामासाठी मोठा निधी मिळत आहे. सत्ता हे साधन असून, विकासासाठी सत्ता महत्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या नऊ वर्षांत देशाने सर्वच क्षेत्रात मोठा विकास करून प्रगती केली असून,
जनतेला अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात मागणीनुसार विकासकामांना निधी दिला जात आहे. कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची जागृती करून तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सक्रीय होऊन कामाला लागावे. प्रास्ताविक अशोक गोरे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक कांजवणे यांनी केले. उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांनी आभार मानले.