अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2021 :- ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत, त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन करुनच नव्या वर्षाचे स्वागत व आगामी सण, उत्सव साजरे करावेत,
असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुंटुब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी केले. आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.(Minister Rajesh Tope)
श्री. टोपे म्हणाले, राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने कालपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी सभागृहामध्ये एका वेळेत उपस्थितांची संख्या 100 पेक्षा अधिक असू नये.
खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वा जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी तितकी असेल. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल.
अशा कार्यक्रमच्या ठिकाणी अधिक गर्दी करू नये. युरोप,अमेरिका येथे ओमयक्रॉनची संख्या वेगाने वाढत आहेत. आपल्याकडे संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी.
नवीन वर्षाचे स्वागत अवश्य करा, मात्र नियमांचे पालन करुनच स्वागत करावे. विशेषतः वृद्ध व्यक्तीनी स्वतःची काळजी घ्यावी. कुठेही गर्दी होणार नाही, याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी.