Changes from 1 April : आज नवीन आर्थिक वर्षाती पहिला दिवस असून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये टोल, सोने आणि करासोबतच इतरही महत्वाचे बदल झाल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे.
याबात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली असून आजपासून नवीन आयकर प्रणालीचे नवीन स्लॅब लागू झाले आहेत. देशात सोन्याच्या विक्रीबाबत आजपासून नवीन नियम लागू होत आहेत. याशिवाय आजपासून इतरही अनेक बदल झाले आहेत.
1. नवीन कर व्यवस्था
देशात १ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून नवीन आयकर स्लॅब लागू करण्यात आले आहेत. सरकारने 2023 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात नवीन स्लॅब जाहीर केले होते, ज्यामध्ये स्लॅबची संख्या 6 वरून पाच करण्यात आली होती. सरकारने म्हटले आहे की नवीन कर प्रणाली डिफॉल्ट असेल. जर कोणाला जुनी रिजीम निवडायची असेल तर त्यासाठी त्याला फॉर्म भरावा लागेल.
2. 7 लाखांपर्यंत करमुक्त कमाई
आजपासून आयकर सवलत मर्यादा 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपये झाली आहे. तथापि, नवीन कर प्रणालीची निवड करणार्यांना हा लाभ मिळेल. नवीन कर प्रणालीमध्ये, आयकर कायद्याच्या कलम 87A अंतर्गत कर सवलत 12,500 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आली आहे. तथापि, नवीन नियमानुसार, 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कराचा लाभ घेणाऱ्यांना 80C अंतर्गत सूट मिळणार नाही.
3. एक्स्प्रेस वेवर प्रवास करणे महाग…
1 एप्रिलपासून देशातील महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवर प्रवास करणे महाग होऊ शकते. दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे आणि NH-9 वर आजपासून टोल टॅक्समध्ये सुमारे 10 टक्के वाढ करण्यात आली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलचे दरही वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता या एक्स्प्रेस वेवर प्रवास करण्यासाठी 18 टक्के जास्त टोल भरावा लागणार आहे. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला टोल टॅक्समध्ये सुधारणा केली जाते.
4. दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य
1 एप्रिल 2023 पासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. आजपासून फक्त 6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. 4 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असलेले दागिने यापुढे विकले जाणार नाहीत.
5. लहान बचत योजनेच्या व्याजदरात वाढ
1 एप्रिल 2023 पासून, अल्प बचतीत गुंतवणूक करणाऱ्यांना ठेवींवर जास्त व्याज मिळेल. सरकारने एप्रिल-जून 2023 या तिमाहीसाठी व्याजदरात वाढ केली आहे. लहान बचत योजनांवरील व्याजदरात 70 बेसिस पॉइंट्स (BPS) वाढ करण्यात आली आहे.
वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिक योजना, मासिक उत्पन्न योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचे व्याजदर वाढवण्यात आले आहेत.
6- म्युच्युअल फंडात बदल
नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून, डेट म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर आकारला जाईल. सरकारने दीर्घकालीन भांडवली नफा रद्द केला आहे. 36 महिन्यांपूर्वी डेट म्युच्युअल फंडाची पूर्तता केल्यानंतर एखाद्याने युनिट्स विकल्यास, नफ्यावर अल्पकालीन भांडवली नफा म्हणून कर आकारला जातो.