महाराष्ट्र

ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढीस मुख्यमंत्र्यांची मान्यता

ST Employee : गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. वेळोवेळी कर्मचारी आणि संघटनांकडून यासाठी पत्रव्यवहार, उपोषण करण्यात आले.

अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, ६ मार्च रोजी मान्यता दिली. तसेच तत्काळ याबाबत कार्यवाही करत हा अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

एसटी कर्मचारी विविध आर्थिक संकटातून जात आहेत. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर याचा फरक देण्याचे शासनाकडून वेळोवेळी मान्य करण्यात आले. मात्र आजही या मागण्या पूर्ण करण्यासाठी विलंब होत आहे.

अलीकडेच महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे सलग ९ दिवस उपोषण केले. याची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी संघटनेसोबत बैठक करत महागाई भत्त्याबाबत तत्काळ विचार केला जाईल, असे सांगत उपोषण मागे घेण्याची संघटनेला विनंती केली.

दरम्यान, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक घालमेल लक्षात घेत बुधवारी एसटी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्याच्या मागणीला मान्यता दिली. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या निर्णयाची तत्काळ अंमलबजाणी करत शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

उच्चस्तरीय समितीची बैठक

गुरुवारी मंत्रालयात उच्चस्तरीय समितीची संघटनेसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने मूळ वेतनात सरसकट पाच हजार, सातवा वेतन आयोग, रुपये ४८४९ कोटींमधील उर्वरित रकमेचे वाटप, वाढीव महागाई भत्ता व फरक, घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराचा फरक,

विद्यमान व सेवानिवृत्त कामगारांचा वर्षभराचा सर्व गाड्यांना चालणारा मोफत पास इत्यादी निर्णय होण्याची शक्‍यता आहे. यामुळे लवकरच एसटी कर्मचारी आर्थिक विवंचनेतून बाहेर पडणार असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

एसटी कामगारांचा महागाई भत्ता ४२ वरून ४६ टक्के तातडीने करण्याचे आदेश शासनाने महामंडळाला दिले, त्याबद्दल शासनाचे आभार. इतर अनेक प्रश्न याबाबत समितीची संघटनेसोबत बैठक होणार असून, आचारसंहितेपूर्वी त्या मागण्यादेखील मान्य होऊन त्यांची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आहे. – संदीप शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: ST Employee

Recent Posts