मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सवलती देणार, अशी ग्वाही दिली आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार असल्याने समाजाने आता आंदोलनावर ठाम न राहता सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुलाब्यातील रिगल टॉकिजसमोरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जालना अंतरवाली ते मुंबई अशी रॅली काढली आहे. २६ जानेवारीला जरांगे- पाटील मुंबईत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली.
मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारचे तीन पाळ्यांत दीड लाख लोकांकडून काम सुरू आहे. आतापर्यंत लाखो कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.
२३ डिसेंबरपासून मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षणाला सुरुवात झाली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण होत आहे. संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असून राज्यभरात सर्वेक्षणाची मोहीम राबवली जाईल. मराठा समाजाने यामुळे आंदोलनावर ठाम न राहता सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत ओबीसींच्या सर्व सवलती मराठा समाजाला दिल्या जातील, असा दावा शिंदे यांनी केला.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा महाविकास आघाडीच्या काळात न्यायालयात टिकला नाही, असे सांगत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी लक्ष्य केले.
तेव्हाची चूक टाळण्यासाठी यंत्रणा काम करत असून आताच्या सरकारची मराठा समाजाला आरक्षण देताना कायदा कोर्टात टिकेल, अशा पद्धतीने कार्यवाही सुरू आहे. तसेच आवश्यकतेनुसार कायदाही करण्यात येईल, असेही शिंदे म्हणाले.