महाराष्ट्र

‘दादा’गिरी ! ‘ते’ आले..रुसले..अन जिंकून घेतलं सार काही !! अजित पवार जिंकले पण त्यागामुळे भाजपवाले त्रासले, सत्तानाट्य भाजपलाच जड जाणार? वाचा

Maharashtra News : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात शिंदे गट शिवसेनेतून फुटला अन भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. हे सत्तानाट्य सुरु असतानाच राष्ट्रवादीतील अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. आता अजित पवार यांना दबून राहावे लागेल,

त्यांना भाजपवाले जे सांगतील तेच करावे लागेल अशी चर्चा होऊ लागली. परंतु अजित पवारांची ‘दादा’गिरी ते येथेही सुरु झाली. अजित पवार सत्तेत आले अन त्यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्यांना ‘खास’ मंत्रिपद पदरात पाडून घेतली.

हे करताना भाजप व शिंदे गटाच्या लोकांची किती मुस्कटदाबी झाली असेल हे सांगणे न लगे. शिंदे गटाचा विरोध असूनही अर्थ खात अन इतर बरीच खाती पवारांकडे गेली. येथे दादांची पॉवर लक्षात आली.

आता मुद्दा काल परवाच्या पालकमंत्री पदाच्या वाटणीचा. अजित पवारांना हवं होत पुण्याचं पालक मंत्रीपद ! पण चंद्रकांत दादा देखील मागे हटणाऱ्यांतले नाहीत. दोन्ही दादांच्या भांडणात (राजकीय?) कुणाचा विजय झाला हे समोर आहे.

अजितदादा रुसून बसले व लगेच शिंदे-फडणवीसांनी दिल्ली गाठून पालकमंत्रिपदांची मंजुरी आणली. रुसलेल्या दादांना खुदकन हसू आले असेल अन त्यांचा आजारही (राजकीय?) पळून गेला असेल. कधीकधी शत्रूपेक्षा मित्रावर दबाव आणून मनासारखे करवून घेणे कठीण असते पण दादांनी ते लीलया केले.

पण यातून अजित पवार भाजप – शिवसेनेला वेठीस धरू शकतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसलं. आता यात अजित दादा जिंकले पण ते यापुढेही आपल्याला असेच वेठीस धरू शकतात याची झलक दिसल्याने भाजपचे दिल्ली, मुंबईतील नेते सावधही झाले असतील.

आता ते शिंदे त्रासदायक आहेत की अजित पवार याची तुलनाही करतील. कारण शिंदे अडचणीचे ठरतायेत असे वाटायला लागले अन अजित दादांना सत्तेत आणले अशी चर्चा होती. पण आता या सगळ्या राजकीय स्थितीत भाजपची स्थिती मात्र बिकट झालीय. जुन्या सिनेमांत दाखवलं जायचं की   सतत त्याग करणारा एक मोठा भाऊ असतो अन आपल्याजवळचे सगळे काही भावा-बहिणींना देऊन तो मोकळा होतो.

भाजपचे काहीस तसेच झालाय. स्वत: नुकसान करून घेत मित्रपक्षांना बळ देण्याची भाजपची रणनीती ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील महाविजयासाठी आहे. महायुतीची गाडी भाजपच्या त्यागावर चालली आहे. आधी मुख्यमंत्रिपद सोडणारे आणि नंतर उपमुख्यमंत्रिपदात वाटेकरी तयार करणारे देवेंद्र फडणवीस या गाडीचे ड्रायव्हर आहेत तर शिंदे-पवार हे दोन कंडक्टर त्यांनी डबल घंटी वाजवली की गाडी सुरू होते; सिंगल घंटी मारली की थांबते.

ड्रायव्हरने या दोघांचेही अजिबात न ऐकता गाडी सुसाट चालवावी, असे गाडीत बसलेल्या भाजपच्या प्रवाशांना वाटते, पण त्यांच्या वाटण्याला फारसा अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीपर्यंत असेच राहील हे मात्र तुम्हा आम्हाला सांगायची गरज नाही. सध्या भाजप केवळ त्याग करत आहे.

सत्तेत लहान भाऊ होते तेव्हाही त्याग, आता मोठा भाऊ आहे तेव्हाही त्याग. विरोधी पक्षात होते तेव्हाही त्याग अन् सत्तेत आहेत तरीही त्यागच. राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद दिल्यास भाजपमध्ये असंतोषाची काही लहरी निर्माण होतील. यामध्ये पुणे, नंदुरबार, कोल्हापूर आदींचा समावेश आहे.

पुण्यात अजित पवारांची ‘दादागिरी’ विरुद्ध भाजप असा सुप्त संघर्ष सुरू राहील. जसे याआधी काँग्रेसला दाबले तसेच आता ‘दादा’ भाजपला दाबातील अशीही चर्चा आहे.  पण मोदी-शहा-फडणवीस यांची जोडगोळी भयंकर हुशार व मुत्सद्दी आहे. ते मात्र काहीतरी वेगलक करतील असे लोक म्हणतात.

हे झाले सत्ताकारणामधील अजित पवारांचे वर्चस्व. पण आजपर्यंत मंत्रालयातील अधिकाऱ्यावर दादांचेच निर्विवाद वर्चस्व ( आदरयुक्त भीती) होते. पण आताही तेच होणार का? कारण   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बरेच मंत्री मंत्रालयात फार कमी येतात. अजित पवार नियमित येतात, बसतात व बैठकही घेतात.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अनुपस्थितीत अजितदादाच मंत्रालयात यायचे; त्यामुळे अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक होता. आताही चित्र जवळपास तसेच दिसत आहे. त्यामुळे ‘ते’ आले..रुसले.. अन जिंकले असेच काहीसे चित्र राजकारणात दिसत आहे.

त्यामुळे भाजपने पायावर धोंडा पाडून घेतलाय का? सध्याची महाराष्ट्रातील स्थिती भाजपसाठी म्हणावी तितकी पोषक नाही अशी चर्चा होत आहे. असे असताना अजित दादा म्हणतील तसेच करत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचेच वर्चस्व वाढवण्याचे काम भाजपवाले करत नाहीत ना? अशीही चर्चा रंगत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts