कर्नाटकातील बंगळुरूजवळील एका गावात एका दलित मुलाने मिरवणुकीदरम्यान हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श केला म्हणून त्याला ६० हजारांचा दंड ठोठावला आहे. जोपर्यंत दंड भरला जात नाही तोपर्यंत संबंधित मुलगा गावात येऊ शकत नाहीत, असेही बजावण्यात आले आहे.
कोलार जिल्ह्याजवळील हुल्लेरहल्ली गावात भुतायम्मा यात्रा होती. या यात्रेत दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. हुल्लेरहल्ली गावात यात्रेनिमित्त मिरवणूक निघणार होती. त्याचवेळी या मुलाने तेथील मूर्तीला स्पर्श करून ती उचलण्याचा प्रयत्न केला.
ह प्रकार तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिला. ही मूर्ती उत्सवासाठी तयार करण्यात आली होती. मिरवणुकीत दलित मुलाने थेट सिद्धिराण्णाच्या मूर्तीला स्पर्श केल्याने वाद अधिक चिघळला.
पंचायत बसली आणि मुलाच्या कुटुंबाला साठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड झालेल्या शोभम्माचे घर गावच्या सीमेवर असून त्यांचा मुलगा जवळच्या गावात दहावीत शिकतो.
या प्रकरणानंतर शोभम्मा म्हणाल्या, ‘जर देवाला आमची इच्छाच नसेल तर आम्ही त्याची पूजा करणार नाही. यापुढे आम्ही फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच पूजा करू.’