Maharashtra News : आळेफाटा पुणे-नाशिक, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर चाळकवाडी व डुंबरवाडी टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांना सूट दिली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक वाहन चालकांना टोल नाक्यावर सूट दिली जात होती. मात्र, आता सर्रास टोल वसुली केली जात असल्याने स्थानिक वाहन चालकात नाराजी पसरली आहे.
परिसरातील शेतकऱ्यांचा आळेफाटा, नारायणगाव, ओतूर येथे कांदा, टोमॅटो, डाळींब लिलाव पध्दतीने विक्री होत असल्याने जवळचे मार्केट म्हणून शेतकऱ्यांचा ओढा आहे. आळेफाटा, ओतूर येथे कांदा तसेच आळेफाटा येथे डाळींब मार्केट तसेच नारायणगाव येथे टोमॅटो मार्केटला जाण्यासाठी शेतकऱ्यांची पुणे-नाशिक व कल्याण अहिल्या नगर महामार्गावरून मोठी जा-ये असते.
स्थानिक वाहन चालकांना चाळकवाडी, डुंबरवाडी या दोन्ही टोल नाक्यावर सूट देण्यात आली असताना शेतकऱ्यांच्या फास्टटॅगमधून पैसे कट झाल्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. या दोन्ही टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून वाहन चालकांना अरेरावी भाषा वापरली गेल्याने अनेक वेळा येथे वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीपर्यंत गेल्याचे ओतूर आणि आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
महिन्याभरात लाखो रुपये टोलनाक्यावर स्थानिकांच्या वाहनातून जमा झाले आहेत. या दोन्ही टोलनाक्यावर स्थानिक वाहनांचे रेकॉर्ड ठेवणार सॉफ्टवेअर नसल्यामुळे ही लुटमार होत असल्याचा आरोप वाहन चालक मालकांनी केला असून स्थानिकांची ही लूटमार कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक वाहनधारकांसाठी ३३० रुपयांचा मासिक पास असून त्यांनी तो काढून घ्यावा, अन्यथा फास्टटॅगमध्ये बॅलन्स कमी ठेवावे. पैसे कट झाल्यास १०३३ नंबरवर फोन करून तक्रार करावी, असे चाळकवाडी टोलनाका व्यवस्थापक सागर पवार यांनी सांगितले.
अन्यथ रस्त्यावर उतरणार
स्थानिक वाहनधारकांकडून प्रशासनाने टोल आकारू नये, टोल स्थानिकांकडून आकारल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष तान्हाजी तांबे यांनी दिला.