Ration Card : महाराष्ट्र राज्यातील रेशन दुकानदारांच्या प्रलंबित हक्काच्या मागण्यांसाठी उद्या सोमवारी (दि.११) रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आज रविवारपासून पुढील ३ दिवस धान्य उचल व वाटप बंद राहणार आहे.
याबाबतचे निवेदन शेवगावचे तहसीलदार यांना अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य व रॉकेल परवानाधारक असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष मीनाताई कळकुंबे यांनी दिले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील रास्तभाव दुकानदार यांचा नागपूर येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हक्काच्या मागण्यांबाबत (दि.११) डिसेंबर रोजी भव्य मोर्चामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदार सामील होत आहेत.
याकरीता नगर जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांची दुकाने (दि.१०) डिसेंबर ते (दि. १२) डिसेंबर हे तीन दिवस धान्य उचल व वाटप हे बंद राहणार आहे. त्यामुळे सदरील मोर्चास जाणाऱ्या दुकानदारांस सहकार्य करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
सदर निवेदनावर अहमदनगर जिल्हाध्यक्ष मीनाताई कळकुंबे, पोपट पाखरे, अंबादास खंडागळे, अंकुश झांबरे, लाला शेख, पुंजा बर्डे, अंबादास खंडागळे, मतीन शेख, विठ्ठल गव्हाणे, भारत हरवणे, शिंगटे यांच्या सह्या आहेत.