घरापासून दुरावलेल्या बेवारस मनोरुग्णांची दिवाळी गोड

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-दिवाळी सण आनंद लुटण्याचा नव्हे आनंद वाटण्याचा सण आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक दुर्बल घटकांची परिस्थिती बिकट बनली असताना बाबासाहेब बोडखे या उपक्रमशील शिक्षकाने राबविलेले सामाजिक उपक्रम प्रेरणादायी आहे.

शिक्षकांच्या अनेक समस्या त्यांनी वेळेवेळी आंदोलने, निदर्शने व निवेदने देवून शासनदरबारी मांडून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील विविध घटकासाठीचे बोडखे यांचे कार्य आदर्श व प्रेरणादायी आहे.

युवकांनी सोशल मिडीयात न गुरफटता बाबासाहेब बोडखे यांच्यासारखे सामाजिक वंचित, निराधार व गरजू लोकांसाठी काम उभे करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

घरापासून दुरावलेल्या बेवारस मनोरुग्णांची दिवाळी गोड करण्यासाठी उपक्रमशील शिक्षक बाबासाहेब बोडखे यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित अरणगाव रोड येथील मानवसेवा प्रकल्पास सहा महिने पुरेल इतके अन्न-धान्य, फळे, मास्क, महिलांसाठी साड्या व पुरुषांसाठी कपड्यांची भेट दिली.

यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक तथा उपक्रमशील शिक्षक बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, संजय शिंगवी, निलेश बांगर, दिलीप पालवे, किशोर आहिरे, राजू बोडखे, गौतम मुथा, विराज बोडखे, नचिकेत बोडखे, बबन जाधवर, सोहेल शेख, सुखदेव नागरे आदी उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून बेवारस मनोरुग्णांना आधार मिळाला आहे. तर बोडखे सारखे शिक्षक सामाजिक बांधिलकी जोपासून आपले योगदान देत आहे. दिवाळी हा अंधकार दूर करणारा सण असल्याने प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपत गरजवंतांना आधार देण्याचे त्यांनी आवाहन केले.

श्री अमृतवाहिनी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंजाळ यांनी प्रास्ताविकात सध्या मानवसेवा प्रकल्पात 30 मनोरुग्णांवर उपचार सुरु असून, सहाशेपेक्षा जास्त मनोरुग्णांवर उपचार करुन त्यांचे कुटुंब शोधून पुनर्वसन करण्यात येत असल्याचे सांगून संस्थेचे कार्य विशद केले.

महेंद्र हिंगे यांनी टाळेबंदी काळात बाबासाहेब बोडखे यांनी सामाजिक जाणीव ठेऊन मोठे योगदान दिले आहे. यापूर्वीही त्यांनी तपोवन रोड येथील मतीमंद शाळेस अन्न-धान्य, गणवेश व मास्कचे वाटप केले. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सावेडी येथील यशोदानगर भाजी मार्केट येथे अडीच हजार मास्क व दीड हजार हातमोजेचे वाटप केले.

तर नुकतेच त्यांनी स्वखर्चाने इयत्ता 8 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या स्वाध्याय व अभ्यास पुस्तिकांचे वाटप केले असल्याची माहिती दिली.

बाबासाहेब बोडखे म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटकाळात माणूस माणसापासून दुरावत असताना माणुसकीच्या भावनेने सामाजिक कार्य सुरु आहे. निराधार, गरजूंना काहीतरी मदत व्हावी या भावनेने कार्य केले आहे. बेवारस मनोरुग्णांची दिवाळी गोड होण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts