वीज बदलतेय रंग ! यंदा महाराष्ट्रासह भारतात कोरड्या दुष्काळाचे संकेत

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : विजा आपले रंग बदलत आहेत आणि त्यांचा निळसरपणा कमी होत असून त्या लालसर बनत आहेत. विजांचा रंग फक्त भारतातच बदलत आहे. त्यामुळे ही कोरड्या दुष्काळाची चाहूल असू शकते, असे प्राथमिक संशोधन निष्कर्ष हवामान संशोधक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी मांडले आहेत.

प्रकाशाची ऊर्जा ही प्रकाशाचा रंग ठरवते. दृश्य व अदृश्य अशा दोन्ही प्रकाशांचा अभ्यास केला तर अनेक गुपिते उलगडू शकतात. दृश्य विद्युत चुंबकीय वर्णपटात जितकी ऊर्जा जास्त तितकी प्रकाशाची कंप्रता म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त, असा सरळ भौतिकशास्त्रीय नियम आहे.

याचाच अर्थ लाल प्रकाशाच्या तुलनेत जास्त फ्रिक्वेन्सी असलेला निळा प्रकाश हा प्रति फोटॉन जास्त ऊर्जा वाहून नेतो. विविध वातावरणीय घटकांचा परिणाम हा विजांवर होतो, हे सत्य असले तरी काही गृहितके धरून जटिल गणितीय आकडेमोड केली तर लक्षात येते की, विजांचा निळा प्रकाश निर्माण तेव्हा होतो जेव्हा लाल प्रकाशापेक्षा १.३८ पट जास्त ऊर्जा विजांमध्ये असते.

थोडक्यात, जेव्हा वातावरणात जास्त अॅटमॉस्फिरिक इलेक्ट्रिसिटी एनर्जी असते, तेव्हा आपल्याला निळ्या आणि पांढऱ्या विजा चमकताना दिसतात तर जेव्हा कमी ऊर्जा असते तेव्हा विजा ‘रेड सिग्नल’ देतात.

जेव्हा वातावरणात जास्त अस्थिरता व ऊर्जा असते तेव्हा पाऊस व मान्सून चांगला होतो. जितकी कमी ऊर्जा तितका कोरडा दुष्काळ तीव्र असे ढोबळमानाने मानले जाते, असे जोहरे यांनी सांगितले.

फायद्याची जलसप्तपदी !

१८ टक्के जागतिक लोकसंख्या असलेल्या भारताच्या वाटेला एकंदर जागतिक उपलब्ध पेयजलाच्या केवळ ४ टक्क्यांपेक्षा कमी पेयजल उपलब्ध आहे, हे वास्तव आहे. जलप्रदूषणाबाबत आपली बेफिकीर वृत्ती व समज बदलणे आवश्यक आहे.

संभाव्य कोरड्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशात तातडीने जल व्यवसथापनाचे उपाय योजून अमलात आणणे गरजेचे आहे.

१.) घरगुती जलवापर, शेतीसाठी पाणी, औद्योगिक जलवापर यावर तातडीने मर्यादा आणत कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे.

२.) टॉयलेटमधील फ्लश टैंक वापर, व्हेईकल वॉशिंग, रस्ते धुणे, नळ व पाइपलाइन गळती यातून होणारा ४० ते ६० टक्के पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गंभीरपणे उपाय गरजेचे आहेत.

३.) शेतकऱ्यांनी उपलब्ध जलसाठे याचा स्वानुभवाने नियोजन व निर्णय घेत शेतात कमी पाण्यात तयार होणाऱ्या डाळी, कडधान्ये किंवा भरड धान्ये यांना प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे.

४.) ऊस, तांदूळ आदी जास्त पाण्याची पिके घेणे आणि ती करपली की मोठे नुकसान सहन करणे आपल्याला किती झेपणार आहे याचा सारासार विचार करूनच सुयोग्य निर्णय शेतकरी घेऊ शकतात.

५.) भूगर्भातील जलसाठे पुन्हा भरण्यासाठी आधी केलेले सिमेंटीकरण काढणे अथवा पर्यायी मार्ग शोधणे आवश्यक आहे.

६.) इस्रायलप्रमाणे समुद्रजलाचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याची अपरिहार्य गरज आहे.

७.) समन्वय, सहकार आणि समजूतदारपणाने एकमेकांना मदत हे धोरण राष्ट्राराष्ट्रांतून सजग होत राबवल्यास दुष्काळाचा सामना करता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe