सध्या समाजात आपण विविध घटना पाहतो त्यातील काही काळजाचा ठाव घेणाऱ्या तर काही काळजात घर करणाऱ्या असतात. समाजात सध्या मुलामुलींचे पळून जाण्याचे अनेक प्रकार घडतात.
यातील काहींचा पोलीस शोधही घेतात व पालकांच्या स्वाधीन करतात. पण आता एक अशी घटना समोर आली आहे की ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. एक प्रेमी जोडपे पळून गेले. पालकांनी मुलगी हरवल्याची तक्रार केली. पोलिसांनी त्यांना शोधलेही.
पण पोलिसांनी त्यांचे प्रेम पाहता दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलवत त्यांच्या संमतीने पोलीस ठाण्याच्या दारातच त्यांचे लग्न लावून दिले. ही घटना घडलीये लातूर मध्ये.
अधिक माहिती अशी : लातूर शहरातील स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे असून तेथे संबंधित मुलीच्या वडिलांनी ३० एप्रिल रोजी मुलगी हरवल्याची तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस तपास करत असतानाच पोलीस हेड कॉन्स्टेबल आरडी जाधव यांनी या तरूणीला शोधुन ताब्यात घेतले.
त्यावेळी ती तिच्या प्रियकरासोबत असल्याचे त्यांना आढळून आले. या प्रेमी जोडप्याने एकमेकांसोबत लग्न करण्याची ईच्छा पोलिसांसमोर व्यक्त केली.
यानंतर पोलिसांनी या तरूणीच्या पालकांशी संपर्क साधत समक्ष लग्नाची विचारपूस करत विचारणा करत चौकशी केली. विशेष म्हणजे यावेळी मुलीच्या घरच्यांनी लग्नाला संमती देखील दाखवली.
परंतु त्यांनी हे लग्न पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच व्हावं असा आग्रह धरला. मुलगी व मुलाच्या मामाच्या विनंतीवरून हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पोलीस ठाण्याच्या दारातच संपन्न झाला.
विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात मुलीच्या मामाने मनी मंगळसूत्र, जोडवे, पैंजण, नविन कपडे, साडी फुलांचे हार आदी साहित्य देखील आणले होते. उपस्थित नातेवाईकांच्या साक्षीने पोलीस ठाण्याच्या आवारात हा आगळावेगळा लग्नसोहळा पार पडला.