Maharashtra News : शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक बाबींना सामोरे जावे लागत असल्याने शासनाने अॅपद्वारे ई-पीक पाहणी पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे तलाठ्यांनी मॅन्युअली नोंद करावी. असे झाले नाही तर, या दुष्काळाच्या तडाख्यात शेतकरी पीक विम्यापासून, सरकारी मदतीपासून वंचित राहतील, अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.
आमदार तनपुरे यांनी राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील नगर तालुक्यातील डोंगरगण येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली. यावेळी नगर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर व गावातील कृषी सहाय्यक स्थानिक शेतकरी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.
आ. तनपुरे म्हणाले, पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. उत्पादनात ७०-८० टक्क्यांनी घट होईल इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. येथील शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे;
मात्र त्यासाठी ई पिक पाहणी होणे – आवश्यक आहे. दुर्दैवाने आतापर्यंत फक्त २५ टक्के क्षेत्राची पाहणी पूर्ण झालेली आहे. दोन दोन तास अॅपद्वारे ई-पिक पाहणीसाठी वेळ घालवला मात्र नोंदणी झालेली नाही, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे.
यासारख्या अनेक तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अॅपद्वारे ई- पिक पाहणी पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे तलाठ्यांनी मॅन्युअली नोंद करावी. असे जर झाले नाही तर, या दुष्काळाच्या तडाख्यात शेतकरी पिक विम्यापासून, सरकारी मदतीपासून वंचित राहतील. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घालावे.