२ जानेवारी २०२५ : घरातून पळून जाण्यासाठी मुलीला मदत केल्याच्या संशयावरून बाप-लेकाने कोयता आणि कुऱ्हाडीने एकाचे शिर छाटले.त्यानंतर हे तुटलेले मुंडके घेऊन दोघांनीही थेट पोलीस चौकी गाठली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (१ जानेवारी) ननाशी (ता. दिंडोरी) येथे घडला.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गावात तणावाचे वातावरण असून, तेथे एसआरपीच्या तुकड्या व पेठ, दिंडोरी, बाहे, हरसूल, वणी येथील पोलीस पथकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ननाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारील पाण्याच्या टाकीसमोर ही घटना घडली. मुलीस पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या संशयावरून सुरेश बोके व रामदास ऊर्फ रामड्या बोके (रा. सरकारी दवाखान्यासमोर, ननाशी) या पिता-पुत्राने कोयता व कुऱ्हाडीने घाव घालत गुलाब रामचंद्र वाघमारे (३५, रा. ननाशी) यांचे शिर धडावेगळे केले.
तसेच, छाटलेले शिर, कोयता व कुऱ्हाड घेऊन दोन्ही संशयितांनी नजीक असलेली पोलीस चौकी गाठली. पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेत घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मयत गुलाब यांची पत्नी मीनाबाई वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार, रात्री पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हणून घडली घटना
गुलाब वाघमारे व बोके पिता-पुत्र ननाशी येथे परस्परांच्या शेजारी राहतात. बोके यांची मुलगी काही दिवसांपूर्वी घरातून पळून गेली. पळून जाण्यासाठी तिला गुलाब वाघमारे यांनी मदत केल्याचा संशय बोके यांना होता. त्यामुळे काही दिवसांपासून त्यांच्यात भांडणं होत होती. त्या भांडणांचे रूपांतर अखेर हत्याकांडात झाले.