Maharashtra News : देशभरात चालू असलेल्या ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणाबाबत केंद्र सरकारच्या गृह सचिवांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्लीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये नवीन नियमावली लागू करण्याच्या आधी
त्यातील त्रुटींबाबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस यांच्याशी चर्चा करूनच अंतिम आदेश काढण्यात येईल, असे आश्वासन गृह सचिवांनी दिले. त्यामुळे बुधवार, ३ जानेवारीपासून संप मागे घेण्यात येत आहे, असे महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.
देशातील आणि राज्यातील वाहतूकदार संघटना यांच्याशी मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रीय स्तरावर झूम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी याबाबत अंतिम निर्णय घेताना देशातील सर्व संघटनांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या बैठकीला ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट समिती आणि वाहतूकदार संघटना यांना निमंत्रित केले होते. देशातील आणि राज्यातील चालकांनी सोमवारपासून संप सुरू केला. त्यांच्या आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस होता.
मंगळवारी रात्री केंद्रीय कॅबिनेट सचिव यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर रात्री १० वाजेपर्यंत सर्व संघटनांनी मिळून संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे बाबा शिंदे यांनी सांगितले.