अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- सहा महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत शासनाच्या वतीने शासन निर्णय निर्गमीत करण्यात आल्याने दि.1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या सहा महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याचा मार्ग आखेर मोकळा झाला असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
शिक्षक परिषदेच्या वतीने आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांना दि.8 जानेवारी रोजी शासनास विसर पडलेल्या 3 टक्के महागाई भत्ता तसेच 5 टक्के थकबाकी रोखीने देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती.
जुलै 2019 ला महागाई भत्ता 12 टक्के वरून 17 टक्के झाला होता. ही वाढ शासनाने डिसेंबर 2019 पासून लागू करून 17 टक्के महागाई भत्ता नियमित सुरू केला होता. परंतू दि.1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 ही 6 महिन्याची थकबाकी नंतर निर्णय करुन देण्याचे सांगितले होते.
यासंदर्भात शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक आमदार गाणार, अध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्यवाह नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, मुंबई विभागाचे उल्हास वडोदकर, शिवनाथ दराडे यांनी शासनाशी वारंवार पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याने सदर प्रश्न मार्गी लागला असून, या निर्णयाचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.