अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- गणेश उत्सवात आयोजित करण्यात येणारा प्रवरा सांस्कृतीक व क्रिडा महोत्सव कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर यावर्षी रद्द करण्यात आला असुन, कुटुंबाच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या आरोग्य रक्षणासाठी यावर्षीचा गणेश उत्सवही घरगुती पध्दतीने साजरा करावा असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्राव्दारे गणेश मंडळांना केले आहे.
गेली अनेक वर्षे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राहाता तालुक्यातील गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरील कलाकारांना व्यासपीठ मिळावे म्हणून या उत्सवाच्या पार्श्वभूमिवर प्रवरा सांस्कृतीक व क्रिडा महोत्सवाचे आयोजनही करण्यात येते.
या महोत्सवात लोकसहभागही मोठा असतो. त्यामुळे या सांस्कृतीक महोत्सवाचा नावलौकीकही मोठा झाला. यंदा मात्र कोरोना संकटाचे सावट या उत्सवावर असल्याने यंदाचा गणेश उत्सव साध्या पध्दतीने घरातच साजरा करण्याचे आ.विखे पाटील यांनी सुचित केले आहे.
या संदर्भात आ.विखे पाटील यांनी तालुक्यातील गणेश मंडळ, ग्रामस्थ आणि पदाधिका-यांना एका पत्राव्दारे केलेल्या आवाहानात, महाराष्ट्राचे सांस्कृतीक वैभव असलेल्या श्री.गणेश उत्सवाला २२ ऑगस्ट पासुन सुरुवात होत असली तरी, कोवीड-१९ च्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या महामारीच्या संकटाने या उत्सवावर व आनंदावर यंदा मर्यादा आल्या आहेत.
उत्सवात होणा-या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती असल्याने यावर्षीचा सांस्कृतीक व क्रिडा महोत्सव रद्द करुन हा गणेश उत्सव घरगुती व साध्या पध्दतीने साजरा करण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाचे संकट रोखण्यासाठी आत्तापर्यंत आपण सर्वांनी कसोशिने प्रयत्न केले असुन, कुटुंबाच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या आरोग्य रक्षणासाठी विन्घहर्त्या गणेशाचा उत्सव घरातच सार्वजनिकरित्या न करता साजरा करुन हे संकट दुर करण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन आ.विखे पाटील यांनी सर्व गेणश भक्तांना केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved