अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- आमदारांच्या पगार व पेन्शनला कोट्यावधी रुपये लागतात. मात्र निधी नसल्याचे कारण देत शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची पेन्शन योजना गुंडाळल्या जातात.
याबाबत सैनिक समाज पार्टीच्या वतीने राज्य कार्यकारणी अध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवली आहे.
आयुष्यातील 30 ते 32 वर्षे शासकीय नोकरी करणार्या कर्मचार्याला 22 ते 25 हजाराची पेन्शन मिळते. पाच वर्षे आमदार म्हणून काम करणार्या लोकप्रतिनिधीला 50 हजार रुपये पेन्शन मिळत आहे.
ही मोठी तफावत असून, एका बाजूला शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा बनाव केला जातो. अशा परिस्थितीत स्वत:चे पगार आणि पेन्शन या सुविधांसाठी सत्ताधारी आणि विरोधक या प्रश्नावर गळ्यात गळे घालत असल्याचे दिसून येते.
सरकारी तिजोरी पैसे नसल्याने जनहितासाठी आजी-माजी आमदारांनी पेन्शन, पगार, भत्त्यांचा लाभ न घेता एक आदर्श निर्माण करण्याचे आवाहन सैनिक समाज पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.