Maharashtra News:एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घकाळ चाललेल्या संपाला पुढील महिन्यात वर्ष होत आहे. तोपर्यंतच एसटी कर्मचाऱ्यांवर पुन्हा संपाचा विचार करण्याची वेळ आली आहे.
मागील सरकारने दिलेल्या आश्वासानाप्रमाणे देण्यात येणाऱ्या निधीत सध्याच्या सरकारने कात्री लावली आहे. त्यामुळे एसटीचे कर्मचारी नाराज झाले असून संप झाल्यास ऐन सणासुदीच्या दिवसांत पुन्हा प्रवाशांचे हाल होणार आहे.
पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता, तेव्हा कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पुढील चार वर्षे ३६० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिले होते.
परंतु, आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीवर निर्बंध लादण्यात आले आहेत राज्य सरकारने ३६० कोटी रुपयांऐवजी १०० कोटींचा निधी दिले आहेत.
त्यामुळे एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतना आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम देणे अवघड झाले आहे. एसटीचे प्रत्येक महिन्याचे उत्पन्न ४५० कोटींच्या आसपास आहे.
तर एसटी यंत्रणा चालवण्यासाठी महिन्याला साधारण ६५० कोटी रुपयांचा खर्च आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३१० कोटी, डिझेलसाठी २५० कोटी आणि इतर गोष्टींसाठी साधारण ९० कोटीचा खर्च येतो.
त्यामुळे आता उर्वरित पैशांची व्यवस्था कुठून करायची, हा पेच एसटी महामंडळासमोर उभा राहिला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते.
जवळपास सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. मार्च २०२२मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर संप मिटला. मात्र, आता पुन्हा कर्मचाऱ्यांकडून याचा विचार सुरू झाल्याचे सांगण्यात येते.