अहमदनगर :- गेल्या पंधरा वर्षांपासून तुम्ही तुमचा खासदार पाहिला आहे का? त्यामुळे तुम्ही पक्षाकडे पहाण्यापेक्षा व्यक्तीकडे पहा, परिस्थिती बदलायची असेल तर माणूस बदला.
दोन वर्षांपासून मी मतदार संघात फिरत आहे. त्यामुळे कोणत्याच पक्षाने तिकीट दिले नाही, तरी मी अपक्ष म्हणून मी लोकसभा लढविणारच आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी खर्डा येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.
काँग्रेसचे युवानेते डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत खर्डा येथे युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.
डॉ. विखे म्हणाले की, ‘मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने खोट्या प्रचाराची कास धरून जनतेच्या मनात गोंधळ निर्माण केला. त्या गोंधळात लाट निर्माण होऊन अकार्यक्षम माणसे निवडून गेली.
सामान्यपणे निसर्गनियमाप्रमाणे मोतीबिंदू झाला असे ऐकिवात होतो, परंतु भाजपच्या खोट्या प्रचारामुळे जनतेलाच मोदीबिंदू झाला होता, पण हरकत नाही.
आपण एक डॉक्टर असल्यामुळे जनजागृती करून हा मोदींबिंदू बरा करू, ज्यामुळे सामान्य माणसाला भाजपचा खरा चहेरा दिसेल. त्यांच्या खासदारांचेही पितळ उघडे पडेल.
नगर दक्षिणच्या विद्यमान खासदारांच्या विकासकामांच्या पोकळ दाव्यांना सामान्य माणुसे भुलणार नाहीत.
उलटपक्षी टक्केवारीवर राजकारण करणाऱ्या खासदारांचा पतंग जनताच या निवडणुकीत कापल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा ठाम विश्वास डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला.