अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पंढरपुरातील कराडकर मठाचे विद्यमान मठाधिपती जयवंत महाराज पिसाळ यांची काल दि. ७ रोजी हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपी बाजीराव जगताप याला आज न्यायालयासमोर उभे केले असता सोमवार, १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दरम्यान, मठाच्या परंपरेनुसार मीच मठाधिपती होतो, मात्र माझा अधिकार डावलल्याने आपण ही हत्या केल्याची कबुली बाजीराव जगताप याने पोलिसांना दिली आहे. आपल्याला मठाबाहेर काढण्यासाठी बंडातात्या कराडकर व जयवंत महाराज यांनी कट केल्याने आपल्याला या दोघांनाही संपवायचे होते, अशी खळबळजनक कबुली आरोपीने दिली आहे.
या घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्या आठ जणांचे पोलिसांनी जबाब घेतले असून, केवळ आपल्याला डावलले गेल्याने प्रचंड रागात आरोपीने जयवंत महाराजांना संपविले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.
या घटनेबाबत आता आणखी माहिती समोर येत आहे. गुरुला अग्नी मी दिला असल्याने मठाधिपती मीच असल्याचा आरोपीचा दावा आहे. कराडकर मठाची परंपरा गुरू-शिष्य अशी आहे. गुरूंच्या निधनापूर्वी शिष्याची निवड केली जाते, त्या शिष्याला परंपरा पुढे चालविण्यासाठी आजन्म ब्रह्मचारी राहावे लागते.
गुरूंच्या निधनानंतर तो शिष्य गुरुंच्या चितेला अग्नी देतो, तोच पुढे मठाधिपती होतो. या परंपरेनुसार यापूर्वीचे मठाधिपती मारुतीबुआ कराडकर यांच्या चितेला अग्नी शिष्य म्हणून बाजीराव जगताप याने दिला होता व त्यानंतर परंपरेनुसार त्याची मठाधिपती म्हणून निवड झाली होती.
मात्र, त्यांचे वर्तन विश्वस्त व भक्त मंडळीमधील काही जणांना मान्य नसल्याने त्याला बाजूला सारुन वै. जयवंत महाराज पिसाळ यांना मठाधिपती करण्यात आले होते. यामुळे कराडकर भक्त मंडळीमध्ये दोन गट पडले होते. त्यातील ४० टक्के मंडळी जयवंतबुवाच्या मागे होती. हा वाद न्यायालयात देखील चालू होता. त्यावर निर्णय अद्याप झाला नसल्याने आरोपी बाजीराव स्वत:ला मठाधिपती म्हणवून घेत होता.
वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे प्रत्येक शुद्ध एकादशीला मठात आलेल्या भक्तांसाठी दशमी, एकादशी व द्वादशी हे तीन दिवस कीर्तन करावयाचे व कराड येथील मठात परतायचे, असा नित्यक्रम मठाधिपतींचा असतो. त्यानुसार विद्यमान मठाधिपती जयवंत महाराज व बाजीराव हे ६ जानेवारी रोजी झालेल्या एकादशीसाठी पंढरपुरात आले होते.
मठात होणाऱ्या कीर्तनापैकी एक कीर्तन तरी मला करू द्यावे, अशी त्याची मागणी होती. मात्र, विश्वस्तांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वै. जयवंत महाराज व मठातील इतर मंडळी त्यास कीर्तन करू देत नव्हते. दरम्यान, मठाधिपती पदावरुन बाजूला काढल्यानंतर आपल्याला विश्वस्त व काही भक्तमंडळी अपमानास्पद वागणूक देत असत; तसेच या वादातून झालेल्या भांडणात कराड पोलीस स्थानकात त्याच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.
तसेच काही महिन्यांकरिता त्यास हद्दपार करण्यात आले होते. या सर्व गोष्टींचा मोठा राग बाजीराव याच्या मनात धुमसत होता. या रागातूनच त्याने द्वादशी ७ जानेवारीस मठाधिपती जयवंत महाराज यांच्या खोलीत जाऊन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यातील राग शांत न झाल्याने त्याने चाकूने चेहऱ्यावर व डोळ्यावर सपासप वार करुन व खोलीत असलेला वरवंटा देखील त्याने त्यांच्या डोक्यात घातला. त्यामुळे जयवंत महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.