Maharashtra News : स्थानिक शेतकऱ्यांच्या तोंडी मागणीवरून आश्वी खुर्द ग्रामपंचायतीने वादग्रस्त निर्णय घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वी खुर्द ते दाढ रस्त्याच्या कडेला लावलेली १०० ते १५० झाडे ग्रामपंचायत प्रशासनाने छाटण्याऐवजी थेट तोडल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व झाडे तोडणारा ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाईची मागणी वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
आश्वी खुर्द येथील बाजारतळ ते दाढ रस्त्यावरील कोकजे वस्तीपर्यंत तसेच आश्वी- शिबलापूर रस्त्यावरील कॅनाल ते भैरवनाथ मंदिर परिसरातील स्ट्रीट लाईटच्या तारेखालील झाडे तसेच शेतीचे नुकसान होत असल्याचे म्हणत
स्थानिक शेतकऱ्यांनी तोंडी मागणीवरून ही झाडे छाटण्याची परवानगी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे मागितली होती.
दुसरीकडे वनविभागाला मात्र रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरीकावर बिबट्याचे हल्ले होत असल्याचे म्हणत झाडे छाटण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे एकाच परवानगीसाठी दोन वेगवेगळ्या विभागात दोन वेगवेगळी कारणे दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
आश्वी-दाढ रस्त्याच्या कडेला लावलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची झाडे छाटण्याची परवानगी असताना ग्रामपंचायतीने दिलेल्या ठेकेदाराने मात्र ती खोडापासून तोडण्याचा घाट घातला.
ही माहिती स्थानिक ग्रामस्थांना कळताच सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड, बाबासाहेब भोसले, मोहित गायकवाड व संतोष भडकवाड यांनी घाव घेत झाडे तोडणाऱ्याना जाब विचारला, मात्र तोपर्यंत लहान मोठी १०० ते १५० झाडे तोडण्यात आली होती.
लाखो रुपये खर्च करुन दहा ते बारा वर्षे शासनाने जोपासलेली झाडे कोणताही मागचा पुढचा विचार न करता छाटण्याऐवजी थेट खोडापासून तोडल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्री यांच्या पोर्टलवर देखील तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान “शासन झाडे लावा झाडे जगवा'” हे अभियान राबवत असताना आश्वी खुर्द ग्रामपंचायत मात्र या अभियानाला हरताळ फासत असल्याचे समोर आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड, बाबासाहेब भोसले, मोहित गायकवाड, संतोष भडकवाड, युन्नुस सय्यद, विशाल शिरतार, पांडुरंग गायकवाड, राजेंद्र शिंदे, विशाल गव्हाणे, आशुतोष शिंदे, विठ्ठल त्रिंबक गायकवाड, मनोज भंडारे,
यशवंत वाल्हेकर, तुषार मांढरे, कुणाल डुबे, देवराम गायकवाड, प्रकाश गायकवाड, राजेंद्र लावरे, दीपक शिंदे, दत्तराज मुन्तोडे, कैलास मुन्तोडे, मस्तानी सय्यद, बाबासाहेब गायकवाड, विजय क्षिरसागर, देविदास पवार,
बाबुराव गायकवाड, बापूसाहेब ‘भवर, सुरेश मांढरे यांच्यासह ३० ते ४० जणांच्या सह्याचे निवेदन देऊन आश्वी खुर्द ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.