अहमदनगर :- माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी ताई विखे पाटील व माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट आरोप केले आहेत.
‘जिल्ह्यातील महिला झेडपी सदस्य ग्रामीण भागातील आहेत. काही अशिक्षित आहेत; तसेच काही सदस्यांना प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव नाही. याचा गैरफायदा घराणेशाहीतील कुटुंबांनी उचलला आणि जास्तीत जास्त निधी पळविण्याचे काम केले.
खासदारकीच्या माध्यमातून दक्षिण मतदारसंघात स्वतःच्या पुत्रासाठी अख्ख्या जिल्हा परिषदेचा वापर करण्यात आला,’ असा घणाघाती आरोप माजी झेडपी सदस्य बाजीराव दराडे यांनी केला.
यावेळी पत्रकारपरिषदेत ते म्हणाले, ‘सभेत सदस्यांना बोलू दिले जात नाही. अध्यक्षा बोलतील तेच ऐकायचे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घालायचे. असे प्रकार सुरू आहेत. जर प्रश्न सुटणार नसतील तर सदस्यांनी निवडून तरी कशाला यायचे?,’ असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले, ‘शिक्षक बदली प्रकरणात विश्वजीत माने यांच्यासारख्या आयएएस अधिकाऱ्यास सत्ता व पैशांचा वापर करुन सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले, मग गटविकास अधिकाऱ्याविरोधात शंभर पुरावे असतानाही त्यास रजेवर पाठवले जात नाही. चांगले अधिकारी यांना चालत नाहीत. अधिकाऱ्यांना ताटाखालचे मांजर करुन प्रशासन चालवणे अभिप्रेत नाही.
विखे कुटुंब अशा पद्धतीने वागणार असेल तर भविष्यात याचे विचित्र पडसाद उमटतील. ‘जिल्हा परिषदेच्या सदस्यांवर अन्याय होत आहे. येथे ठराविक सदस्यांचेच प्रश्न सुटतात. अशा पद्धतीने कारभार होणार असेल तर त्याचा निषेधच केला पाहिजे.