यंदा आरटीई प्रवेशाबाबत अनेक गोंधळाची परिस्थती पालकांत पाहायला मिळाली. दरम्यान आता याबात आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आता सरकारने आरटीईमध्ये सुधारणा करून सरकारीसह सर्वच शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे धोरण घेतले.
परंतु यास विरोध झाल्याने उच्च न्यायालयाने शासनाच्या निर्णयास स्थगिती देऊन पूर्वीप्रमाणेच म्हणजे केवळ विनाअनुदानित शाळांमध्येच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिला. त्यामुळे आता शिक्षण विभागाने नव्याने ही प्रक्रिया सुरू केली असून १७ ते ३१ मेदरम्यान अर्ज करता येणार आहेत. नगर जिल्ह्यात आरटीईअंतर्गत ३५७ शाळांमध्ये ३०२३ जागा आहेत.
दरवर्षी आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत दुर्बल घटकांतील (मागासवर्गीय, तसेच १ लाखांखालील उत्पन्न गटातील) पालकांच्या पाल्यांना आपल्या घराजवळच्या तीन किलोमीटर परिघातील स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. साधारण विनाअनुदानित शाळा अधिक प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्याच आहेत.
त्यात शुल्क अधिक असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील पाल्यांना शिक्षण घेता येत नाही. परंतु आरटीईच्या नियमांतर्गत २५ टक्के प्रवेशाचा फायदा या गरजूंना होतो. वर्षानुवर्षे हीच प्रक्रिया सुरू होती. परंतु यंदा शिक्षण विभागाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी एक अधिसूचना काढून आरटीई प्रवेशाचे धोरणच बदलले. शासनाच्या या अधिसूचनेनुसार एक किलोमीटर परिघात कोणतीही शाळा असेल, मग ती जिल्हा परिषदेची असो किंवा इतर कोणतीही शासकीय असेल तेथे २५ टक्के कोट्यातून प्रवेश घेणे बंधनकारक होते.
परंतु आरटीईतील या अन्यायकारक बदलांविरोधात पालक आणि काही संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्या याचिकांवर ६ मे रोजी झालेल्या सुनावणीमध्ये ९ फेब्रुवारीच्या शासन अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे शिक्षण विभागाने आता ते धोरण रद्द करून पूर्वीप्रमाणेच स्वयंअर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचे धोरण राबविण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांना दिल्या आहेत.
सर्वांनाच पुन्हा करावा लागेल अर्ज
शासनाने ९ फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार आरटीईची प्रवेश प्रक्रिया एप्रिलपासूनच सुरू केली होती. परंतु त्यास पालकांकडून कमी प्रतिसाद मिळत होता. नगर जिल्ह्यात केवल ३ हजार अर्ज आले होते परंतु आता पूर्वी अर्ज केलेला असेल तरी नव्याने अर्ज करावा लागणार आहे. हे अर्ज ३१ मे पर्यंत आरटीईच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करावे लागणार आहेत.
अशी असेल प्रवेश प्रक्रिया
ऑनलाईन आलेल्या अर्जामधून लॉटरी पद्धतीने पहिली यादी निश्चित केली जाईल. नंतर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करून प्रवेश दिले जातील. यात एक प्रतिक्षा यादीही तयार करण्यात येणार आहे. रिक्त जागा राहिल्यास त्यांचा विचार होईल.
आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. मात्र लॉटरीतून प्रवेश निश्चित झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. यात निवासी पुरावा, जन्म तारखेचा पुरावा, जातीचा पुरावा, वार्षिक उत्पन्न दाखला, दिव्यांग असेल तर तसे प्रमाणपत्र, अनाथ, एचआयव्हीबाधीत, घटस्फोटित, विधवा असल्यास आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.