त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास एका बड्या व्यक्तीला जेलमध्ये जावे लागेल !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेत महिला अध्यक्षा असूनही महिलांनाच बोलू दिले जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे़ म्हणूनच पत्रकारांसमोर माझी बाजू मांडावी लागत आहे़ असे म्हणत अकोल्यातील जि.प सदस्य सुषमा दराडे यांनी आपल्या भावना मांडल्या. 

अकोले तालुक्यातील राजूर, आंबेवंगण, शेणीत, केळी, तिरडे, कोतूळ, आंबितखिंड, पळसुंदे, बारी या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे़ बडतर्फ ग्रामसेवक भाऊसाहेब रणशिंगे यांनी आंबेवंगण ग्रामपंचायतीच्या खात्यातून परस्पर 18 लाख 48 हजार तर शेणित ग्रामपंचायतीच्या खात्यातून 75 लाख 69 हजार रुपये परस्पर काढल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

रणशिंगे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा व अपहाराची रक्कम पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करावी म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत़ शासनाने रणशिंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ मात्र, त्यांच्या अद्याप वसुली केलेली नाही़ त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करावी, अशी मागणी असल्याचे दराडे म्हणाल्या़

ग्रामसेवक रवींद्र ताजणे यांनी कोतूळ, पळसुंदे, आंबितखिंड या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन शासकीय रकमेची वसुली करावी, अशी मागणी दराडे यांनी केली़

राजूर ग्रामपंचायतीतही 99 लाखांचा अपहार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे़ मात्र, तेथील ग्रामसेवकावरही अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही़ या सर्व ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी आणि बिडीओंवर कारवाई करावी, अशी मागणी दराडे यांनी केली आहे. दरम्यान राजूर ग्रामपंचायतींच्या अनियमिता प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास एका बड्या व्यक्तीला जेलमध्ये जावे लागेल, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts