Jayakwadi Water Storage:- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथे असणारे जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे धरण असून मराठवाड्यातील शेतीचे मदार जायकवाडी धरणावर म्हणजेच नाथसागर जलाशयावर अवलंबून आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
परंतु यावर्षी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कमी पर्जन्यमान झाल्यामुळे या धरणामध्ये आवश्यक तेवढा पाणीसाठा नव्हता. त्यातच नाशिक जिल्ह्यामधून असलेल्या धरणातून पाण्यासाठीचा मध्यंतरीच्या कालावधीत संघर्ष देखील उभा राहिला होता
व अखेर नाशिक जिल्ह्यातील काही धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. परंतु सध्या कडाक्याची थंडी असताना देखील मात्र जायकवाडी धरणातील पाण्याचा बाष्पीभवण्याचा वेग वाढल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सध्या किती आहे जायकवाडी धरणात पाणीसाठा?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी असताना देखील मात्र जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये कमालीची घट होताना दिसून येत आहे व थंडीत देखील बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे.
आपण जायकवाडी धरणाचा विचार केला तर या धरणातून विविध मराठवाड्यातील शहरे व एमआयडीसीसाठी होत असलेल्या उपशापेक्षा देखील दुप्पट पाण्याचे बाष्पीभवन होत असल्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होताना दिसून येत आहे.
जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र पाहिले तर ते 21 हजार 750 चौरस किलोमीटर आहे. परंतु हे धरण उथळ असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन लवकर होते. सध्या जर बाष्पीभवनाचा वेग पाहिला तर तो साधारणपणे दररोज 0.425 दशलक्ष घनमीटर इतका आहे.
सध्या या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा 43.5% इतका आहे. या धरणाच्या पाटबंधारे विभागाच्या मुख्य ऑफिसच्यामागे बाष्पीभवन मापक यंत्र कार्यान्वित करण्यात आले असून या ठिकाणी दररोज होणाऱ्या बाष्पीभवनाची नोंद करण्यात येते.
गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेगात वाढ झाली असून उन्हाळ्यामध्ये हा वेग दोन पट अधिक असतो. जायकवाडी धरणातून औद्योगिक तसेच घरगुती वापराकरिता 0.290 दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा होतो.
परंतु त्याच्या दुपटीने दररोज बाष्पीभवन धरणाच्या पाण्याचे होत आहे. तरी कडाक्याची थंडी आहे परंतु दुपारच्या दरम्यान कमाल तापमानात वाढ होत असल्यामुळे हा वेग वाढल्याचे सध्या चित्र आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा 43.5% आहे.