अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- अपत्यप्राप्तीसंदर्भात जाहीर कीर्तनातून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला आहे.
इंदुरीकरांच्या विरोधातील सुनावणीला त्यांनी वकीलामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्याबाबत आज होणारी सुनावणी टळली असून, पुढील सुनावणी दिवाळीनंतर 25 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे.
स्त्री संग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो. विषम तिथीला झाला, तर मुलगी होते असे आक्षेपार्ह विधान इंदोरीकर महाराज यांनी केले होते. या विधानाची व्हिडिअ क्लिप सोशल माध्यमांवर झळकली होती.
या विधानामुळे तसेच या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती.
या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सांनी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. यामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये 19 जून रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.
दरम्यान न्यायालय अन्य कामात व्यग्र असल्यामुळे या खटल्याचे आज होणारे युक्तीवाद व सुनावणी टळली असून, दिवाळीनंतर 25 नोव्हेंबर रोजी या खटल्याचे पुढील कामकाज होणार असल्याची माहिती अॅड. रंजना गवांदे – पगार यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved