Pune Ring Road News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. या रिंग रोडमुळे शहरात वाहतूक कोंडी होणार नाही
असा आशावाद व्यक्त होत आहे. हा 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रिंग रोड शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. या प्रकल्पाचे काम मात्र पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात केले जाणार आहे. सध्या स्थितीला या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
अशातच या प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पातील भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे वर्ग केला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या पश्चिम भागातील कामासाठी आत्तापर्यंत 850 एकर जागेचा ताबा घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या महिन्याअखेरपर्यंत अर्थात जानेवारी 2024 अखेरपर्यंत 1560 एकर जमिनीचा ताबा घेण्याचे नियोजन आहे.
यासाठी 1,000 कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत याबाबतची मागणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
याशिवाय फेब्रुवारी महिन्यात अर्थातच पुढल्या महिन्यात केल्या जाणाऱ्या भूसंपादनासाठी आणखी एक हजार कोटी रुपयांची मागणी या बैठकीत जिल्हा प्रशासनाने केली आहे. आतापर्यंत पश्चिम भागातील जमिनीसाठी 1529 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे उर्वरित 175 कोटी रुपयांचे वाटप देखील लवकरच होणार आहे. अशातच आता आणखी दोन हजार कोटी रुपयांची या प्रकल्पासाठी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला असून
शासन लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेईल अशी माहिती देखील सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. यामुळे साहजिकच या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असून प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे.