अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी थेट महाविकास आघाडीलाच घरचा आहेर दिलाय. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच छायाचित्रे आहेत.
त्यामुळे ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची, असा सवाल उपस्थित करत किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही, असे प्रश्न तांबे यांनी विचारलाय.
तांबे यांनी ट्विट करुन मनातली खदखद व्यक्त केलीय. या ट्विटमध्ये तांबेंनी म्हटलंय, आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही, हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे.
तांबे यांनी प्रश्न उपस्थित करुन, महाविकास आघाडीतील कुरबुर पुन्हा एकदा उघड केलीय. महाविकास आघाडी सरकार असताना, महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवर केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे फोटो आहेत. यामध्ये काँग्रेस नेत्याचा फोटो नाही.
तांबे यांनी जे ट्वीट केलंय, त्या जाहिरातीवर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे फोटो आहेत. हे सर्व त्या विभागांशी संबंधित मंत्री आहेत.
दरम्यान, यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा फोटो असणे अपेक्षित होतं, अशी कदाचित तांबे यांची भावना असू शकेल. मात्र थोरात यांचा किंवा अन्य कोणत्याही काँग्रेस नेत्याचा फोटो नसल्याने, तांबे यांनी हा प्रश्न विचारला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews