Maharashtra Monsoon: मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मान्सूनपूर्वी होणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील होत आहे. तर आता हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 29 आणि 30 मे रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
27 मे पासून कोकणातील हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दरम्यान जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर पुढील आठवड्यात राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे 29 आणि 30 मे रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे एक दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशात 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने सांगितले की भारतात सामान्य पाऊस पडेल. मात्र जून महिन्यात कमी पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने सांगितले की जूनमध्ये दक्षिण भारतातील काही भाग, वायव्य भारत, सुदूर उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागात जेथे सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय देशाच्या बहुतांश भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जून महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मान्सूनच्या पावसाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार देशभरात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य आणि दक्षिण भारतात सरासरी पाऊस पडेल, तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असेही त्यात म्हटले आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सून उशिरा येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. केरळमध्ये साधारणपणे 1 जूनपासून मान्सून सुरू होतो. मात्र यंदा मान्सूनचा हंगाम 4 जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मान्सून 2022 मध्ये 29 मे , 2021 मध्ये 3 जून आणि 2020 मध्ये 1 जून रोजी दक्षिणेकडील राज्यात पोहोचला होता. मात्र, अनुकूल परिस्थिती असल्याने दक्षिण अरबी समुद्रात मान्सूनचे आगमन होण्यास आता फारसा वेळ नाही.
त्यामुळे केरळमध्ये मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची शक्यता कमी आहे. आता मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होईल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. तर 11 जूनच्या सुमारास मान्सून मुंबईत दाखल होईल.
हे पण वाचा :- BGMI लव्हर्ससाठी आनंदाची बातमी ,भारतात ‘या’ दिवशी घेता येणार गेमिंगचा आनंद; वाचा सविस्तर