महाराष्ट्र

Maharashtra Politics : विरोधक म्हणजे बाहेरून कीर्तन, आतून तमाशा !

Maharashtra Politics :मागील काळातील महाविकास आघाडीचे सरकार वसुलीबाज व भ्रष्टच होते. आघाडीच्या सरकारमुळे विकासकामे ठप्प झाली होती. विरोधक म्हणजे बाहेरून कीर्तन, आतून तमाशा असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले असून, हे सरकार निश्चितपणे गतिमान असल्याचा दावाही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

फडणवीस यांच्या हस्ते नगर शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला. तसेच शासकीय इमारतीचे भूमिपूजनही केले.

त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संवाद मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीच्या सरकारवर खोचक टीका केली. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेते आहेच, याशिवाय ते आता जगाचे नेते झाले आहेत. जगात त्यांना मानणारा वर्ग प्रचंड मोठा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा कायापालट होत आहे. विरोधक वज्रमूठ बांधण्याची भाषा करू लागले आहेत.

मात्र त्यांच्याकडे सक्षम नेतृत्व नाही. भारतीय जनता पक्षाला सक्षम नेतृत्व लाभले असून, आगामी वर्षभराचा कालावधी महत्त्वाचा आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी छोट्या-मोठ्या गोष्टीला महत्त्व न देता पक्षासाठी झटून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केली.

विखे-शिंदेंमध्ये वाद नाही पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व माजी मंत्री राम शिंदे यांच्यात वाद नाही, असे स्पष्ट केले. दोघेही माझ्या बाजूला बसले आहेत.

त्यांच्यात कसलाच वाद नाही. वाद असेल तर तो चहाच्या पेल्यातीलच होता, वाद म्हणजे वादळ नाही, असा खुलासाही त्यांनी केला. ‘त्या’ बोलघेवड्यांना नाही कामधंदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर फडणवीस यांनी सडाडून टीका केली. ‘कोण राऊत ?’ असा प्रतिप्रश्न करीत ते म्हणाले, हे कामधंदा नसलेले बोलघेवडे लोक आहेत.

आमच्या मागे भरपूर कामे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांत समन्वय आहे. लोकसभा जागावाटपात कोणताही मतभेद नाही, असे त्यांनी नमूद केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts