Maharashtra News : राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या तिजोरीत अधिकचा महसूल पडावा आणि त्यासोबत एसटी प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी, यासाठी राज्यात अधिकृत एसटी थांबे ठेवण्यात आले आहेत.
मात्र बऱ्याचदा काही बस चालक करार नसलेल्या हॉटेलवर एसटी थांबवत असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊन आर्थिक फटका बसत आहे. हा सर्रास प्रकार महाराष्ट्रात महामार्गावरील खासगी हॉटेल्समध्ये पाहायला मिळतो.
एसटी महामंडळाने महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या काही हॉटेलसोबत करार केले आहेत. त्यामुळे करार केलेल्या हॉटेलवर बस थांबवणे चालकाचे कर्तव्य आहे. खासगी वाहतुकीच्या तुलनेत एसटी महामंडळाने एसटीच्या प्रवाशांना उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी ३० रुपयांमध्ये चहा-नाष्ट्याची योजना अमलात आणली.
यासाठी राज्यात ५० अधिकृत थांबे निवडले गेले. त्या ठिकाणी असलेल्या हॉटेलांमध्ये तिकीट दाखवल्यानंतर प्रवाशांना प्रसाधनगृहाची सोय आणि चहा-नाष्ट्याची अल्प दरात सेवा मिळते. इतकेच नव्हे तर एसटीला प्रत्येक फेरीमागे अधिकृत हॉटेल मालकांकडून दर सुद्धा मिळतो. त्यामुळे एसटीच्या महसुलात वाढ होते.
मात्र एसटीचे बहुतेक चालक-वाहक स्वतःच्या मर्जीतल्या हॉटेलवर करार नसताना देखील बस थांबवतात. यामुळे खाद्यपदार्थ खाताना प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. अशा बेकायदेशीर होत असलेल्या प्रकारात एसटी महामंडळाचे चालक, वाहक व खासगी हॉटेल मालकांमध्ये साटेलोटे असल्याने हॉटेल चालक प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचे प्रकार समोर येतात.
त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अशा बसचालकांवर कारवाईचा बडगा उगारणार का ? हे पाहणे औचित्याचे राहणार आहे. महामंडळातील काही एसटी चालक, वाहक हे स्वतःच्या फायद्यासाठी नियम धाब्यावर बसवून अनधिकृत अर्थात खासगी हॉटेलवर बस थांबवतात.
त्यातून त्यांना चहा-नाष्टा विनामूल्य दिला जातो. शिवाय हॉटेल मालकांकडून त्यांना पैसे दिले जातात. याचा फटका आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रवाशांना बसतो. एसटी प्रवाशांची खासगी हॉटेलात होणारी आर्थिक लूट कुठेतरी प्रशासनाने थांबवली पाहिजे, अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या.