Maharashtra Weather Alert: राज्यासह मागच्या काही दिवसांपासून देशातील इतर भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. यातच आता हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसासह वादळाचा इशारा दिला आहे.
आजपासून राज्यातील काही भागात विशेषत: पश्चिम घाटात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या एप्रिल-मेच्या उन्हाळ्यात राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकऱ्यांना मे महिन्यातही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत.
या सगळ्यात हवामानात सतत बदल होत असल्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हवेतील आर्द्रता अद्यापही कमी न झाल्याने मुंबई, कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांना दिलासा मिळणार नाही. तर येत्या 48 तासांत राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 48 तासांत मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. IMD नुसार, पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, भंडारा, लातूर, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह हलके ते मध्यम वादळ आणि पावसाची शक्यता आहे. या दरम्यान उष्णता कमी होईल आणि हवेतील आर्द्रता वाढेल. तत्पूर्वी रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह परिसरात अवकाळी पाऊस झाला. यादरम्यान काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला.
नैऋत्य मान्सूनची वाटचाल ज्या वेगाने होत आहे, ते पाहता महाराष्ट्रात त्याचे आगमन होण्यास आणखी काही दिवस लागतील, असे दिसते. मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाचा अंदाज आणखी बदलला आहे.
हवामान तज्ञ आणि भारतीय हवामान विभागच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे महाराष्ट्रात पोहोचण्यास आणि नंतर संपूर्ण राज्य व्यापण्यास 4-5 दिवसांचा विलंब होऊ शकतो.
मान्सून साधारणत: 7 जूनच्या सुमारास दक्षिण महाराष्ट्रात दाखल होतो तर 15 जूनपर्यंत तो संपूर्ण राज्य व्यापतो. परंतु सध्याची परिस्थिती पाहता यंदा महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्यास सुमारे चार ते पाच दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मुंबईत मान्सून साधारणपणे 10 जूनला दार ठोठावतो, पण यंदा तो 15 जूनच्या आसपास उशिरा पोहोचू शकतो.
हे पण वाचा :- Health Tips : सावधान! चुकूनही रिकाम्या पोटी ‘या’ 4 गोष्टींचे सेवन करू नका, नाही तर आतड्यांना ..