महाराष्ट्र

महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार; राज्यातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा

तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड ने दुसरा व तीसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

या तीन नगरपालिकांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले आहे. यासह महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे.

आज विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा नगर विकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-2021 चे राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रिय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मनीपुर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा हे मंचावर उपस्थित होते. .

राष्ट्रीय स्तवरावरील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांना, नगरपालिकांना, लष्करी छावण्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तर इतर पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते वितरित करून गौरविण्यात आले. तसेच केंद्रीय राज्य मंत्री श्री. कौशल यांच्या हस्तेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या 40 टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत. वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 147 शहरांचा समावेश आहे.

यामध्ये राज्यातील 55 शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 143 शहरे आहेत त्यात महाराष्ट्रातील 64 शहरांचा समावेश आहे. फाईव स्टार मानांकनामध्ये देशभरातील 9 शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये राज्यातील नवी मुंबई या शहराचा समावेश आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेला 6 कोटी रूपयांचा धनादेश बक्ष‍िस स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण 48 शहारांची निवड करण्यात आली होती त्यात राज्यातील 10 शहरांचा समावेश आहे. एक ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये राज्यातील 27 शहरांचा समावेश आहे.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये राज्यातील 56 शहरे आहेत तसेच यामध्ये पहिले वीस शहरे ही महाराष्ट्राचीच आहेत. या एकूण स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामगिरीसाठी राज्याला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रिय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

हा पुरस्कार राज्याचे नगर विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी स्वीकारला त्यांच्यासोबत राज्य स्वच्छ मिशन (नागरी)चे अभियान संचालक अनिल मुळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts