Mahavitaran News:- विजेच्या बाबतीत अनेक प्रकारच्या तक्रारी वीज ग्राहकांच्या असतात व अनेक समस्या देखील वारंवार निर्माण होत असतात. यामध्ये जर सगळ्यात मोठी समस्या पाहिली तर ती वाढीव वीज बिलाची समस्या ही होय. आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा वाढीव वीज बिलाच्या तक्रारी केल्या जातात किंवा आपल्याला ऐकायला देखील येतात.
घरातील वीज वापरापेक्षा अव्वाच्या सव्वा विजबिल आल्याचे प्रकरणे आपण बघितले असतील. तसेच महावितरणच्या बाजूने पाहिले तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देखील प्रत्येक महिन्याला थकीत वीज बिल वसुलीसाठी वारंवार ग्राहकांकडे जावे लागते व त्यामध्ये इतर तांत्रिक बाबींकडे कर्मचाऱ्यांना लक्ष देता येत नाही.
अशा अनेक प्रकारच्या समस्या विजेच्या संबंधी उद्भवतात. परंतु आता महाराष्ट्रामध्ये महावितरणच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्यात येत असून या कामाला महावितरणच्या माध्यमातून आता वेग देण्यात आलेला आहे. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याला वेग
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याला प्रचंड प्रमाणात विरोध होत आहे.परंतु तरी देखील महावितरणच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला वेग देण्यात आलेला असून एकट्या विदर्भामध्ये 52 लाख 6 हजार 982 स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. यामध्ये एकट्या गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन लाख 98 हजार 374 स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत.
या कामाला गती देण्याच्या उद्देशाने यासाठी नेमलेल्या एजन्सीला काम सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. या संबंधीचा महत्त्वाचा असा करार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून फेब्रुवारी 2024 पासून हे मीटर बसवण्याचे काम सुरू होणार आहे. जेव्हा स्मार्ट मीटर बसवले जातील तेव्हा ग्राहकांना जेवढा रिचार्ज असेल तेवढीच वीज वापरता येणार आहे.
जवळपास याकरिता महाराष्ट्रात 26000 कोटी रुपये खर्च केले जाणार असून प्रत्येक मीटर या माध्यमातून बदललेले जाणार असून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे. या मीटर मध्ये मोबाईल सारखीच पोस्टपेड आणि प्रीपेड अशा सुविधा देण्यात येणार असून हे संपूर्णपणे काम एका कंत्राटदार कंपनीकडून पूर्ण करण्यात येणार आहे.
जर आपण गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर मार्ट मीटर बसवण्याकरिता ज्या कंपनीची निवड करण्यात आली आहे त्या कंपनीला 27 महिन्यांचा कालावधी लागणार असून याच कंपनीकडे 93 महिने या संबंधीची देखभाल म्हणजेच मेंटेनन्सची जबाबदारी देखील असणार आहे.
विशेष म्हणजे हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ट्रांसफार्मर आणि सबस्टेशन मध्ये देखील बदल करण्यात येणार असून ते देखील स्मार्ट करण्यात येणार आहेत. यासंबंधीचा डेटा सेंटर आणि जीपीएस यंत्रणा विकसित करण्यात येणार असून यासंबंधीची जबाबदारी देखील संबंधित कंत्राटदार कंपनीकडेच असणार आहे.
कसे करेल स्मार्ट मीटर काम?
या प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये जेवढा रिचार्ज केलेला असेल तेवढेच वीज ग्राहक वापरू शकणार आहेत. म्हणजेच ग्राहकांचे जेवढे पैसे आहेत तेवढेच वीज वापरता येईल आणि पैसे संपतात वीज पुरवठा आपोआप खंडित होईल. एवढेच नाही तर ग्राहकाने किती विजेचा वापर केला याची नियमितपणे माहिती ग्राहकाला मोबाईलवर मिळेल.
तसेच भरलेल्या पैशांपैकी म्हणजेच रिचार्ज केल्यापैकी किती पैसे शिल्लक आहेत? हे कळणार असल्यामुळे ग्राहकाला आर्थिक नियोजन करून विजेचा वापर करता येणे शक्य होणार आहे. महत्वाचे म्हणजे हे जे काही नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत ते पूर्णपणे मोफत बसवण्यात येणार आहेत व याकरिता ग्राहकांना कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही.