Maharashtra News : मराठा समाजाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आरक्षणसंदर्भातील कायद्याचा मसुदा सार्वजनिक करावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, रवींद्र वायकर, राजेश टोपे, सुनील प्रभू यांच्यासह महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सोमवारी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली.
मराठा समाजात आरक्षणासंदर्भात असंतोषाची भावना असून उद्रेक होऊ शकतो. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड झाले आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून मराठा समाज आत्महत्या करत आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधा. आंदोलकांना आश्वस्त करा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. जरांगे-पाटील यांची तब्येत प्रचंड खालावलेली असून अघटित घडू नये यासाठी मध्यस्थी करा.
त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवा. सरकार सकारात्मक तोडगा काढणार असेल तर आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून सहकार्य करू. परंतु सध्याचे सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्याची बाब शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही अंबादास दानवे यांनी सांगितले.
विधिमंडळ अधिवेशन तातडीने बोलवा !
राज्यात दुष्काळी सावट आहे. शेतीचे प्रश्न गंभीर बनले आहेत. सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. एकीकडे मोठ्या घोषणा करायच्या, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे.
अशा स्थितीत मराठा बांधवांना आश्वस्त करण्यासाठी हिवाळी अधिवेशनापूर्वी आरक्षणाच्या कायद्याचा मसुदा सार्वजनिक करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्याच्या सूचना सरकारला द्याव्यात, असे गाऱ्हाणे राज्यपालांकडे घातले