महाराष्ट्र

MHADA Lottery : दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यभरात म्हाडाचा गृहधमाका

MHADA Lottery : म्हाडाच्या माध्यमातून केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यभरात सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मुंबई मंडळाच्या सोडतीत स्पष्ट केले होते.

त्यानुसार म्हाडाच्या पुणे मंडळाच्या माध्यमातून येत्या आठवड्याभरात पुणे मंडळाच्या ५ हजारांहून अधिक घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

तर कोकण मंडळाच्या माध्यमातून ४ हजार ५०० व औरंगाबाद मंडळाच्या माध्यमातून ४०० घरांच्या सोडतीची लगबग सुरू करण्यात आली आहे. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर १० हजार घरांची सोडत म्हाडाच्या माध्यमातून पार पडणार आहे..

म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी म्हाडाच्या पुणे, कोकण व औरंगाबाद मंडळाने सोडतीची तयारी सुरू केली आहे. यामध्ये पुणे मंडळाची ५ हजार, कोकण मंडळाची ४ हजार ५००,

तर औरंगाबाद मंडळाची ५०० हून अधिक घरांची सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीची जाहिरात २५ ऑगस्टदरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार असून तेव्हापासून अर्ज विक्री व स्वीकृतीला सुरुवात करण्याची शक्यता आहे.

कोकण मंडळांतर्गत विरार बोळिंज, ठाणे, डोंबिवली येथील घरांचा, तर पुणे मंडळांतर्गत सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांचा व औरंगाबाद मंडळांतर्गत औरंगाबाद, आंबेजोगाई आणि लातूरमधील घरांचा समावेश असणार आहे. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश सोडतीत असणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts